व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –स्वाइन फ्लू असेल, कोरोना असेल वा अन्य साथीचे आजार; गुंतागुंतीच्या शस्रक्रिया असोत की अन्य गंभीर विकार यावर उपचार करणारे महापालिकेची रुग्णालये व दवाखाने रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहेत.
त्यात आता चार नवीन रुग्णालयांची भर पडली असून त्यांद्वारे ऑक्टोबर २०२१ ते सप्टेंबर २०२२ या वर्षभरात तब्बल पाच लाख २८ हजार १४२ रुग्णांनी उपचारांचा लाभ घेतला आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह (वायसीएम) पिंपरीतील जिजामाता, चिंचवडमधील तालेरा, आकुर्डी, भोसरी, यमुनानगर, सांगवी, थेरगाव असे आठ रुग्णालये होते. त्यात नवीन भोसरी, नवीन जिजामाता व नवीन थेरगाव या रुग्णालयांची भर पडली आहे. त्यामुळे खाटांची संख्या वाढून रुग्णांची सोय झाली आहे. कोरोना काळात वायसीएमसह नवीन भोसरी, नवीन जिजामाता व नवीन थेरगाव रुग्णालयांत रुग्णांवर उपचार करण्यात आली. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची तिथे व्यवस्था होती. शिवाय, महापालिकेचे २९ ठिकाणी दवाखाने आहेत. त्यांचाही लाभ रुग्ण व नातेवाइकांना मिळत आहे.
रुग्णालयनिहाय खाटा (बेड)
वायसीएम ः ७६०
नवीन भोसरी ः १००
नवीन जिजामाता ः १२०
नवीन थेरगाव ः २००
कुटे आकुर्डी ः १३०
एकूण ः १३१०
विभागनिहाय रुग्णसंख्या
(ऑक्टोबर २०२१ ते सप्टेंबर २०२२)
बाह्यरुग्ण (ओपीडी) ः ४,९८,२५१
आंतररुग्ण (आयपीडी) ः २३,८२४
प्रसूती (सिजरीयन डिलिवरी) ः २०,६५
प्रसूती (नॉर्मल डिलिवरी) ः ४००२
वर्षभरात एकूण रुग्ण ः ५,२८,१४२
चारही रुग्णालये जून 2021 मध्ये पूर्ण क्षमतेने सुरू झाली. सुरूवातीला या रुग्णालयामध्ये रुग्णांचे येण्याचे प्रमाण कमी होते. जून 2021 मध्ये चार रुग्णालये मिळून बाह्यरूग्ण सेवा विभागात (ओपीडी) 22 हजार 5 इतकी रूग्ण उपचार घेत होते. तर दाखल रूग्ण संख्या (आयपीडी) 508, सिजरीयन प्रसुती 34 व नॉर्मल प्रसुतीची संख्या 147 इतकी होती. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एक वर्षामध्ये चार रुग्णालयांमधील ओपीडीची संख्या 60 हजार इतकी झाली आहे. आयपीडी संख्या 3,500 इतकी आहे. दर महिन्याला चारशेहून अधिक नॉर्मल प्रसुती व सुमारे 300 सिजरीयन प्रसुती होत आहेत.
पालिकेच्या थेरगाव, आकुर्डी, जिजामाता व भोसरी या चारही रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या भागांतील रुग्ण तेथे दाखल होत आहेत. दरमहिना सरासरी 60 हजार रुग्ण उपचार घेत आहेत, असे महापालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.
Discussion about this post