व्हीएसआरएस न्युज पिंपरी – बेवारस किंवा विविध गुन्ह्यांमधील वाहने अनेक वर्षांपासून चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत धूळ खात पडून आहेत.
यापैकी 65 वाहनमालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. गंगामाता वाहन शोध संस्थेच्या माध्यमातून हा शोध घेण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशानुसार शहरातील सर्व पोलीस ठाणे स्मार्ट करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने पोलीस ठाण्यात विविध कामे सुरू आहेत. त्यापैकी एक म्हणजे पोलीस ठाण्याच्या आवारात धूळ खात पडलेल्या वाहनांची संख्या कमी करणे. याबाबत माहिती देताना चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे म्हणाले, ”चिंचवड पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या बेवारस वाहनांचा शोध घेण्यासाठी गंगामाता वाहन शोध संस्थेची मदत घेण्यात आली.
त्यांनी 65 वाहनांच्या चेसी आणि इंजिन नंबरवरून मालकांचा शोध घेतला. आता पोलीस या वाहनमालकांशी संपर्क करून जप्त केलेले वाहन कागदपत्र सादर करून घेऊन जाण्याचे आवाहन करणार आहे. जर वाहनमालकांनी वाहन नेले नाही तर ते वाहन बेवारस आहे असे समजून त्याचा लिलाव केला जाणार आहे.’
वाहनांचे मालक शोधण्याच्या या कामात गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, शिवाजी जव्हेरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे चिंचवडचे पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे यांनी सांगितले.