व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरातील सामाजिक संस्था, संघटना, कार्पोरेट अधिकारी
यांच्यासोबत वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधला. या वेबिनारसाठी 100 जण उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) च्या माध्यमातून या वेबिनारचे आयोजन करण्यात
आले होते.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना विविध उपक्रमांची माहिती दिली.
नागरिकांचे सहकार्य गरजेचे खूप महत्वाचे आहे, असे ते म्हणाले. पोलीस काका, पोलीस दीदी, बडी कॉप आणि पोलिसांच्या विविध उपक्रमातील पोलीस आणि डॉक्टर, समुपदेशक, समाजसेवक, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक यांना व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आणले जाणार आहे. त्यातून नवीन संकल्पनांना बळ दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शहरातील विविध वस्त्यांमधून बाल गुन्हेगार कसे तयार होतात त्याचे दाखले त्यांनी दिले. आई-वडिल
कामासाठी दिवसभर बाहेर जातात. त्यामुळे या मुलांकडे त्यांचे लक्ष नसते, ती नंतर गुन्हेगारीकडे वळतात.
त्यामुळे समाजाचे वातावरण खराब होते. त्यासाठी या मुलांवर संस्कार होणे गरजेचे आहे. मोकाट फिरणाऱ्या
या मुलांना स्कील जॉब मिळवेत यासाठी त्यांना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीकडे आकर्षित होण्याचे प्रमाण त्यातून कमी होऊ शकते. त्यांना वेळीचमार्गदर्शन करून योग्य मार्ग दाखवण्याची गरज आहे. क्रेडाई सारख्या संस्था त्यासाठी पुढाकार घ्यायला तयार आहेत.
सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून अन्य संस्था, संघटनांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती संपविण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. अशा मुलांना मार्गदर्शन, रोजगाराची उपलब्धता वाढवून प्रशिक्षण देऊन मानसिक परिवर्तन करायला हवे, असे मत आयुक्तांनी मांडले. त्यासाठी देखील सामाजिक संस्थाआणि कार्पोरेट कंपन्या पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन या वेबिनारमध्ये देण्यात आले आहे.