व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –शारदीय नवरात्रीची नवमी तिथी 3 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 4:37 वाजता सुरू होत आहे. 4 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2:20 वाजता संपेल. उदयतिथीनुसार, नवरात्रीची नवमी 4 ऑक्टोबर 2022 रोजी साजरी केली जाईल.
शारदीय नवरात्रीत येणा-या नवमीला खंडे नवमी देखिल म्हणतात. खंडे नवमीचे महत्व कारखानदार, कामगार वर्ग तसेच शेतकरी, सैन्यात कार्यरत सर्वांसाठी विशेष आहे. कारण या दिवशी पूर्वापारपासून आयुध म्हणजेच शस्त्रास्त्र आणि उपकरणांची पूजा करण्यात येते. याला अनेक कथा दंतकथा आणि आख्यानांचा आधार आहे. आदिशक्तिने वेगवेगळ्या रुपात असुरांसोबत युद्ध करून सामान्य जनतेला आणि देवांनाही भयमुक्त केले. युद्धात देवीने असुरांसोबत लढण्यासाठी वेगवेगळ्या शस्त्रांचा आयुधांचा वापर केला. त्यामुळे खंडे नवमीला शस्त्रास्त्रांचे पूजन केले जाते.
खंडे नवमी प्रमाणेच नवमीचे दुसरेही महत्व आहे. ते म्हणजे कन्या पूजन किंवा कुमारीका पूजन. हिंदू धर्म परंपरेनुसार देवीच्या नऊ रुपांची पूजा नऊ कन्यांचे पूजन करून केली जाते. या दिवशी दोन ते 10 वर्षापर्यंतच्या वयाच्या कन्यांना घरी बोलवून त्यांचे पाय धुवून त्यांची पूजा करावी. त्यानंतर त्यांना भोजनासाठी बसवावे. जेवणानंतर सुवासिक फुले तसेच वस्त्र देऊन त्यांचा सन्मान करावा. नऊ कन्यांमध्ये देवीची नऊ रुपे पाहावी. कन्या पूजन केल्याने घरात सुख शांती, समृद्धी नांदते. धन-धान्याची कधीही कमतरता राहत नाही. अशी धार्मिक मान्यता आहे.
Discussion about this post