नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओने विकसित केलेल्या मानवाला वाहून नेता येईल अशा रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे.
राजस्थानमधल्या पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे 13 एप्रिल रोजी ही क्षेपणास्त्र चाचणी घेण्यात आली. क्षेपणास्त्राची कार्यक्षमता आणि कामगिरी उत्कृष्ट असल्याचे यावेळी दिसून आले.
हे क्षेपणास्त्र आधुनिक धातू कवचाने संरक्षित मुख्य रणगाड्याला भेदण्यासाठी सक्षम असल्याचे या चाचण्यात आढळले आहे. एटीजीएम अर्थात रणगाडा विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र प्रणाली दिवसा, रात्री तसेच वरुन मारा करण्याच्या क्षमतेने सुसज्ज आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रणालीच्या यशस्वी चाचण्यांबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे तसेच भारतीय लष्कराचे कौतुक करत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित संरक्षण प्रणाली विकासामध्ये आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तसेच डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर व्ही कामत यांनीही या यशाबद्दल चाचण्यांशी संबंधित संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले.
Discussion about this post