व्हीएसआरएस न्युज पुणे : पुणे शहर परिसरात गेल्या पाच दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे हवामान विभागाने पुढील दोन दिवस शहर परिसरात पावसाची शक्यता वर्तवली आहे. खरंतर, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीची चाहूल लागली पण 12 नोव्हेंबरपासून थंडी गायब झाली. यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत असून गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पुणेकरांनी आणि खासकरून शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे,
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात दक्षिण-पश्चिम पूर्व भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे तापमानात वारंवार वाढ होत आहे.
यामुळे पुढील 48तासांत याचं रुपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्टयात होणार आहे. त्यानंतर म्हणजेच 21 नोव्हेंबरच्या सुमारास हा पट्टा ओमानच्या दिशेने पुढे सरकेल.
दरम्यान, पुण्यासह, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे या शहरांमध्येही थंडी गायब झाली असून ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. पुढील दोन दिवस शहर परिसरात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. तर यावेळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.