व्हीएसआरएस न्युज -वाघोली येथे पुणे महामार्गावरील कावेरी हॉटेलच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या ओढ्यामध्ये मानवी हाडांचा सांगाडा कवटीसह मंगळवारी (दि.१) मिळाला आहे. सांगाड्याचा पंचनामा पोलिसांनी केला असून सांगाड्याच्या जवळच दुचाकी मिळाली असल्याने १४ ऑक्टोबर रोजी महामार्गावर आलेल्या पुराच्या पाण्यात सदरची व्यक्ती वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पुणे नगर महामार्गावरील कावेरी हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या ओढ्यामध्ये दुचाकी व मानवी कवटी, हाडे पडली असल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मंगळवारी (दि.१) सकाळी मिळाली. याबाबत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला. मानवी कवटी, अर्धवट सांगाडा, कपडे ताब्यात घेण्यात आले. याच ठिकाणी १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या जोरदार पावसानंतर अनेक दुचाकी वाहून गेल्या होत्या तर सणसवाडी येथील कामगाराचा मृतदेह काही अंतरावर मिळून आला होता. सदरची घटना घडल्यानंतर सुमारे ४५ दिवसानंतर ओढ्यात पुन्हा दुचाकी व सांगाडा मिळून आल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दुचाकीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासात सदरचा सांगाडा वाघोलीतील तरुणाचा असल्याचे प्राथमिक चौकशीत समजले असून सांगाड्याच्या डीएनएच्या आधारे लोणीकंद पोलिसांच्यावतीने खात्री केली जात आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या मदतीने उपनिरीक्षक विक्रम जाधव करीत आहेत.