व्हीएसआरएस न्युज- गतविजेत्या मुंबई इंडियन्सने शनिवारी दिल्ली पॅपिटल्सच्या अडचणी वाढवल्या. ट्रेण्ट बोल्ट व जसप्रीत बुमराह यांचा पुन्हा एकदा सुपर शो आणि इशान किशन याच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दुबई येथे झालेल्या आयपीएल लढतीत दिल्ली कॅपिटल्सचा 9 गडी राखून धुव्वा उडवला आणि नवव्या विजयाला गवसणी घातली.
मुंबई इंडियन्सने 18 गुणांसह तालिकेतील पहिले स्थान कायम राखले. तीन षटकार व आठ चौकारांसह नाबाद 72 धावांची खेळी साकारणाऱया ईशान किशनची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. दिल्ली कॅपिटल्सचे या स्पर्धेतील आव्हान मात्र कायम आहे. अखेरच्या लढतीत विजय मिळवल्यास त्यांचा प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित होऊ शकतो.
ट्रेण्ट बोल्ट व जसप्रीत बुमराह या दोन स्टार गोलंदाजांनी शनिवारचा दिवस गाजवला. दोघांनी दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. ट्रेण्ट बोल्टने 21 धावा देत 3 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जसप्रीत बुमराहने 17 धावा देत 3 फलंदाज गारद केले. दिल्ली कॅपिटल्ससाठी कर्णधार श्रेयस अय्यरने 25 व रिषभ पंतने 21 धावा केल्या. चेंडू हळुवारपणे येणाऱया या खेळपट्टीवर दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही.
दिल्ली कॅपिटल्सची अखेरची लढत सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. या लढतीत श्रेयस अय्यरच्या संघाला विजय मिळवावाच लागणार आहे. मागील चार लढतींमध्ये पराभव झाल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा नेट रनरेट 13 लढतींनंतर निगेटिव्ह झाला आहे. त्यांच्यासाठी इतर लढतींचा निकालही महत्त्वाचा ठरणार आहे.